खेड : भारतीय जनता पार्टी, खेड व श्री. वैभव खेडेकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिपोत्सव २०२५’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला खेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपमाळांच्या प्रकाशात, पारंपरिक सजावटीत आणि उत्सवी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात किल्ला, कंदील आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून, स्थानिक कलागुणांना व्यासपीठ देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. किल्ला स्पर्धेत संत रोहिदास नगर मित्रमंडळाने ‘राजगड’ या भव्य किल्ल्याच्या सादरीकरणातून प्रथम पारितोषिक मिळवले. या विजेत्या मंडळाला रोख पारितोषिक रुपये ५,००० देण्यात आले. द्वितीय क्रमांक ‘जिवलग मैत्री ग्रुप’ने ‘प्रतापगड’ किल्ल्यासाठी तर तृतीय पारितोषिक कु. अयान विनायक गुडेकर यांना ‘रायगड’ किल्ल्यासाठी मिळाले.
तसेच कंदील स्पर्धेत सर्जनशीलतेचा अनोखा ठसा उमटवित श्री. दिलीप प्रभाकर कारेकर यांनी प्रथम पारितोषिक व रुपये ३,००० रोख रक्कमेचे मानकरी ठरले. द्वितीय पारितोषिक श्री. सचिन जाधव तर तृतीय पारितोषिक श्री. मिलिंद सावळाराम बेंडखळे यांना प्रदान करण्यात आले.
तसेच रांगोळी स्पर्धेत सौ. मुग्धा सिद्धेश पाटणे यांनी कलात्मक रांगोळीतून प्रथम क्रमांक पटकावला.या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धांमुळे खेड शहरात दिवाळीचा आनंद आणि सांस्कृतिक उत्सवाची रंगत अधिक वाढली. आयोजकांनी सर्व सहभागी, नागरिक आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील काळात अशाच उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 24-Oct-25












