“मी फ्रँकी खाऊन गुवाहाटीला जाणारा बेईमान नाही!”; बाळ मानेंचा घणाघात

◼️ “रत्नागिरीला माझ्यासारख्या ‘सिंघम’ची गरज” : बाळ माने

रत्नागिरी, ता. २४ (विशेष प्रतिनिधी):
“आदित्य साहेबांसोबत फ्रँकी खात असताना, ३८ आमदार भाजपच्या कळपात जाताच सुरत-गुवाहाटीला पळून जाणारा बेईमान बाळ माने नाही,” अशा स्फोटक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त उपनेते बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. “माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवण्यापेक्षा, उदय सामंत यांनी आपण शिंदे सेनेतच राहणार, भाजपमध्ये कधीच जाणार नाही, अशी शपथ आमचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीसमोर घेऊन दाखवावी,” असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

दिवाळीनंतर रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले. तीन दिवसांपूर्वी सामंत यांनी आपल्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना माने म्हणाले, “बेईमानीचे बाळकडू बाळ मानेला कधीच मिळालेले नाहीत. मी एक वर्षापूर्वी, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘मातोश्री’वर बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच्या तस्बीरीसमोर उद्धवजी, आदित्यजी आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे आणि ते आयुष्यभरासाठी आहे.”

“तो मी नव्हेच, कदाचित शिंदे सेनेतील नेता भाजपमध्ये जाणार”
उदय सामंत यांच्यावर थेट निशाणा साधताना माने म्हणाले, “कदाचित त्यांना (सामंत) असे सांगायचे असेल की शिंदे सेनेतला एक मोठा नेता काही काळानंतर भाजपमध्ये जाणार आहे, पण चुकून त्यांना धनाजी-संताजीसारखे बाळ मानेचे नाव आठवले. गेली २० वर्षे ‘बनवाबनवी’ करणे आणि ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडेपेक्षा जास्त अभिनय करणे, हेच सामंतांनी केले आहे.”

“मी फक्त एकनाथ शिंदे रत्नागिरीत वारंवार का येतात? पालकमंत्र्यांचा प्रशासनावरील प्रभाव संपलाय का? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी विषयांतर केले,” असा आरोपही मानेंनी केला.

भाजप प्रवेशाचे आव्हान आणि CDR तपासण्याची मागणी
आपली भूमिका स्पष्ट करताना बाळ माने यांनी एक धाडसी आव्हान दिले. “माझ्या कुटुंबाने जनसंघापासून भाजपमध्ये ६४ वर्षे काम केले. पण ती पूर्वीची भाजप आता राहिली नाही. ती आता ‘इनकमिंग’वर चालते. मला भविष्यात कधीही भाजपमध्ये जाण्याची गरज नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले, “माझे उदय सामंत यांना आव्हान आहे. माझा मोबाईल सीडीआर (CDR) तपासावा, भाजपच्या निर्णय-नेत्यांच्या कार्यालयासमोरचे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे तपासावेत. मी कधी त्यांच्याकडे गेलेला दिसलो, तर तात्काळ राजकारणातून निवृत्ती घेईन.”

“रत्नागिरीला ‘सिंघम’ची गरज, तो मी आहे!”
पालकमंत्री सामंत यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना माने म्हणाले, “रत्नागिरीच्या जनतेला एका ‘सिंघम’ची (Singham) गरज होती आणि तो सिंघम आज उपनेता म्हणून उद्धवजी ठाकरेंनी रत्नागिरीकरांना दिला आहे. गेली २० वर्षे सामंत यांनी प्रत्येक विरोधी पक्ष ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न केला, दबाव आणला. त्यामुळेच त्यांना सक्षम विरोधी नेता कधी दिसला नाही. आता मी बोलू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत.”

विकासकामांवरून पालकमंत्र्यांना धरले धारेवर
पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांच्या अपयशाचा पाढाच बाळ माने यांनी वाचला. “जनतेची दिशाभूल करू नका. रत्नागिरीच्या जनतेला विकास हवा आहे. तुम्ही विषयांतर कराल, तसे अधिक अडचणीत याल. रत्नागिरीच्या जनतेचे सवाल आहेत:”

चांगले रस्ते कधी मिळणार? खड्डेमुक्त रत्नागिरी कधी होणार? पिण्याचे शुद्ध पाणी २४ तास कधी मिळणार? आरोग्य व्यवस्था: ड्रेनेजअभावी मलेरिया-डेंग्यू पसरतोय. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक कधी आणणार?
रोजगार: पाच वर्षे उद्योगमंत्री आहात, एकही उद्योग रत्नागिरीत आणला नाही, एकाही बेरोजगाराला रोजगार दिला नाही. “उगाच सरकारी पैशाने जर्मनी-जपानला फिरून काय उपयोग? तिथले खड्डे कसे बुजवतात ते शिकून या. जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवा,” असा टोलाही त्यांनी लगावला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
यावेळी बोलताना बाळ माने यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही भाष्य केले. “मला कळते की नोव्हेंबर महिन्यात मुख्य न्यायमूर्ती निवृत्त होण्यापूर्वी शिवसेना पक्षाचा गेली साडेतीन वर्षे प्रलंबित असलेला निर्णय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचित सामंतांनी अनवधानाने त्यांच्याऐवजी माझे नाव घेतले असावे,” असा चिमटाही त्यांनी काढला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 24-10-2025