Ratnagiri: जिल्ह्यातील ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रात १४३ प्रसुती

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६८ पैकी ४७ प्राथमिक आरोग्यकेंद्रात १४३ प्रसूती झाल्या आहेत.

शून्य प्रसूती झालेली २१ प्राथमिक आरोग्यकेंद्रे असून, उर्वरित केंद्रांत १ ते ४ मध्ये प्रसूती झाल्या आहेत. सध्या आरोग्यकेंद्रात महिला शिपाई पदे रिक्त असून, ९२ ठिकाणी प्रसूती अनुभवाच्या मर्यादा असलेले बीएएमएस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे अनेकवेळा चांगल्या सुविधांसाठी गर्भवतीला उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. आरोग्यकेंद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व प्रसूती सेवेत सातत्य राखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले असून, जिल्हास्तरावर साप्ताहिक आढावा बैठकांद्वारे केंद्राची प्रगतीही तपासली जाते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रसूतीविषयक आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली. प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध आहेत. बहुतांश केंद्रांवर नियमित प्रसूती होत असून, काही केंद्रांवर गेल्या काही महिन्यांत प्रसूती न झाल्याचे कारण म्हणजे अनेक गर्भवती महिला अधिक चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयाकडे संदर्भित होतात. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ अखेर ६८ प्राथमिक आरोग्यकेंद्रांपैकी ४७ प्राथमिक आरोग्यकेंद्रात १४३ प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी शून्य प्रसूती झालेल्या २१ प्राथमिक आरोग्यकेंद्र, १ प्रसूती झालेल्या १९ प्राथमिक आरोग्यकेंद्र, २ प्रसूती झालेल्या ९ प्राथमिक आरोग्यकेंद्र, ३ प्रसूती झालेल्या ७ प्राथमिक आरोग्यकेंद्र व ४ पेक्षा जास्त प्रसूती झालेल्या १२ प्राथमिक आरोग्यकेंद्र आहेत.

प्राथमिक आरोग्यकेंद्रात महिला शिपाई पदे रिक्त आहेत. ९२ ठिकाणी वैद्यकीय अधिकारी बीएएमएस पदवीधर असल्याने प्रसूती अनुभवाच्या मर्यादा आहेत. प्रसूतीसाठी महिलांना उच्चस्तरीय संस्थांकडे संदर्भित करावे लागते. या कारणास्तव काही केंद्रांवरील प्रसूतीचे प्रमाण तुलनेने कमी दिसते. बीएएमएस पदवीधर वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रसूती व त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा आरोग्य विभागाकडून जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रसूतीसाठी घरापासून ते आरोग्यसंस्था व प्रसूतीनंतर आरोग्यसंस्था ते पुन्हा घरी सोडण्यासाठी मोफत रुग्णवाहिकेची सोय केली आहे तसेच पात्र लाभार्थींना जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रसूतीनंतर लाभ दिला जातो. सुरक्षित प्रसूतीसाठी जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम व जननी सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवण्यात येते.

११ आरोग्यकेंद्रांचे बांधकाम सुरू
जिल्ह्यातील ६८ पैकी ११ प्राथमिक आरोग्यकेंद्रांचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी प्रसूती करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अन्य पर्यायी इमारतीत आरोग्यसेवा सुरू ठेवण्यात आली असून, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रसूतीसह सर्व नियमित आरोग्यसेवा अधिक सक्षमपणे सुरू करण्यात येतील.

परिस्थिती सुधारण्याचे केंद्रांना आदेश
जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक आरोग्यकेंद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व प्रसूती सेवेत सातत्य राखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर साप्ताहिक आढावा बैठकांद्वारे प्रत्येक केंद्राची प्रगती तपासली जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 24-10-2025