रत्नागिरी, ता. २५ : “मन धावतया तुझ्याच मागं, डोलतया तुझ्याचसाठी…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. हे सुमधूर गाणं ‘iPopstar’ या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये सादर केलं आहे रत्नागिरीच्या एका गुणी कन्येने. रत्नागिरीची राधिका भिडे (Radhika Bhide) हिने गायलेल्या या गाण्याने परीक्षकांना इतके मंत्रमुग्ध केले की, मराठी भाषा समजत नसतानाही त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळल्याचे पाहायला मिळाले.
‘iPopstar’ हा शो एमएक्स प्लेयरवर (MX Player) प्रसारित होत असून, त्याची संकल्पना इतर रिॲलिटी शोजपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या शोमध्ये सहभागी स्पर्धकांना स्वतः लिहिलेली आणि संगीतबद्ध (Compose) केलेली गाणी सादर करावी लागतात. राधिकाने तिचे “मन धावतया…” हे मूळ गाणं सादर करताच संपूर्ण वातावरण भारावून गेलं.
या परफॉर्मन्सवेळी राधिकाने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या सुंदर नऊवारी साडीने आणि मराठमोळ्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. परीक्षक आस्था गिल (Aastha Gill) हिने राधिकाच्या या लूकचे आणि तिच्या आवाजाचे विशेष कौतुक केले. भाषेचा अडथळा असूनही, राधिकाच्या सुमधूर आवाजातील भावना थेट परीक्षकांपर्यंत पोहोचल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.
रत्नागिरीच्या भिडे कुटुंबाचा संगीताचा वारसा राधिका ही मूळची रत्नागिरीची असून, येथील टिळक आळी मध्ये तिचे घर आहे. ती संपूर्ण कोकणात सुप्रसिद्ध असलेल्या ‘योजक असोसिएट्स’चे संस्थापक पर्शराम तथा नाना भिडे यांची नात आहे.
राधिका ही ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम आणि महाराष्ट्राची लाडकी गायिका शमिका भिडे (Shamika Bhide) हिची धाकटी बहीण आहे. या दोन्ही भिडे भगिनींनी रत्नागिरीतील टिळक आळी येथे नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला होता, ज्याला रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला होता.
बहुआयामी कलाकार राधिका गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत राहणारी राधिका, मागील पाच वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. ती केवळ गायिकाच नसून एक संगीत दिग्दर्शक, निर्माती, गीतकार आणि डबिंग आर्टिस्ट म्हणूनही ओळखली जाते. लहान वयातच तिने संगीत क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. तिचे ‘उजेड पडला छान’ हे गाणेही नुकतेच युट्युबवर लोकप्रिय ठरले होते.
अजय-अतुल आणि ए. आर. रेहमान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात संगीत दिग्दर्शक म्हणून मोठे नाव कमावण्याचे राधिकाचे स्वप्न आहे. ‘iPopstar’ मधील या यशानंतर राधिकाचे सर्वत्र कौतुक होत असून, मराठी कलाकारांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचे हे गाणे जास्तीत जास्त रील्स मध्ये वापरल्यास त्याचा फायदा राधिकाला या स्पर्धेत मिळणार आहे. त्यामुळे या गीतावर जास्तीत जास्त रील्स तयार करून राधिकाला पाठींबा द्यावा असे आवाहन देखील आकरण्यात आलंय.











