पाली परिसरातील गॅस ओटीपीची सक्ती शिथिल करून १५ दिवस विलंबाने होणारा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी

पाली (वार्ताहर) : प्रशासनाने घरगुती गॅसधारकांस ओटीपी क्रमांकाचे शिवाय रिफील सिलेंडर देऊ नये असा फतवा काढल्याने पाली सारख्या ग्रामीण भागातील महिला व गॅस ग्राहक आता ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात चांगलेच अडचणीत आले आहेत कारण रत्नागिरी तालुक्यात पाली परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ओटीपी वेळेवर येत नाही आहे त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यातच ग्राहकांनी रिफील गॅस सिलेंडर बुक करूनही १५ दिवस होऊनही येत नसल्याने मोठी अडचण होत आहे. त्याकडेही लक्ष देऊन या भागातील पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

पाली परिसरात सध्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने भूमिगत टाकलेल्या ओएफसी केबल तुटून वारंवार मोबाईल नेटवर्क बंद पडत आहे तसेच या परिसरात गेले पंधरा दिवस दुपारनंतर विजांच्या कडकटासह जोरात पाऊस होत असल्याने मोबाईल नेटवर्क बंद असते. त्याच शिवाय साठरे बांबर, वळके, पाथरट, खानू, कशेळी, सरफरेवाडी, कापडगाव, नागलेवाडी या भागात अद्यापही सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने या गावातील ग्राहकांना नेटवर्क अभावी ओटीपी प्राप्त होत नाही. अशावेळी हे ग्राहक नेटवर्कमध्ये येऊन गॅस बुकिंग करतात त्यावेळी पेट्रोलियम कंपन्यांच्या सर्व्हरला तांत्रिक बिघाड असल्याने अनेकदा ओटीपी प्राप्त होत नाही. अशा दुहेरी कात्रीत ग्राहक सापडलेले असून त्यांना सिलेंडर मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

त्यामुळे शासनाने व लोकप्रतिनिधींनी किमान काही महिने तरी संगमेश्वर तालुक्यात ज्याप्रमाणे ग्रामीण भागातील ग्राहकाला ओटीपी शिवाय सिलेंडर द्यावेत अशा सुचना सचिवालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवरच पाली परिसरातील ओटीपीची अट किमान आता ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात तरी काही दिवस स्थगित करुन या भागात १५ दिवस विलंबाने होणारे गॅस वितरण तातडीने पूर्ववत करण्याची मागणी ग्राहकातून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 23-10-2024