चिपळूण-शिवाजीनगरच्या पंपामुळे नागरिकांना त्रास; आज बैठक

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर बस स्थानकात असलेल्या सीएनजीपंपामुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे. या संदर्भात नागरिकांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

सोमवारी सकाळी अकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयामध्ये या पंपाच्या संदर्भात बैठक होणार आहे.

चिपळूण शहरात शिवाजीनगर बस स्थानकाच्या आवारात सीएनजी पंप पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आला. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली. सुरवातीला या ठिकाणी केवळ एसटी बसमध्ये सीएनजी भरला जात होता. आता येथे खासगी वाहने सीएनजी भरण्यासाठी लागतात. या वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे तसेच वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सीएनजी पंपाच्या कॉप्म्प्रेसरच्या आवाजामुळे रात्री या भागातील नागरिकांची झोप मोड होते. शिवाजीनगर भागात राहणाऱ्या पाचशेहून अधिक नागरिकांना प्रदूषण, धूळ आणि आवाजाचा त्रास होत आहे. त्यामुळे या भागातील काही गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन १५ ऑगस्ट २०२५ ला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढली. परंतु नागरिकांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना झाली नाही. दिवाळीच्या निमित्ताने पर्यटनासाठी निघालेले अनेक वाहन चालक सीएनजी पंपावर सीएनजी बनण्यासाठी थांबले. त्यांच्या वाहनांच्या आवाजामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास झाला त्यामुळे येथील सुमुख गृहनिर्माण संस्थेसह नागरिकांनी पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत पोलिस, पालिका आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या भागातील ग्रामस्थ सोमवारी सकाळी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांची भेट घेणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 27-10-2025