राजापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी प्रथमच निवडून आलेल्या आमदारांसाठी पाच कोर्टीचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता विकासाची चिंता करू नका, तुम्ही फक्त प्रामाणिकपणे व निष्ठेने महायुती सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन आ. किरण सामंत यांनी केले आहे.
तळवडे येथे झालेल्या एका पक्ष प्रवेश कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एक मेळावा झाला. यावेळी आमदार नीलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री ना. शिंदे यांच्याकडे या वाढीव निधीसाठीची आग्रही मागणी केली.
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदार संघात केलेल्या विकासकामांचे आ. राणे यांनी कौतुक केले. आम्हाला देखील आमच्या मतदारसंघात विकासाला गती द्यावयाची आहे, मात्र अपुऱ्या निधीमुळे कधी कधी ते शक्य होत नाही. तरी आम्हाला खासकरून नव्याने प्रथम निवडून आलेल्या आमदारांना आमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी वाढीव निधी द्यावा, अशी मागणी केली.
याची दखल ना. शिंदे यांनी आपल्या भाषणात घेत आ. नीलेश राणेंच्या मागणीचा नक्कीच आम्ही सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर मुंबईत जाताच त्यांनी नवीन आमदारांसाठी पाच कोटी वाढीव निधी देण्यात येईल, असे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी ही मागणी मान्य करून आ. नीलेश राणेच नाहीत, तर माझ्यासह राज्यात प्रथमच निवडून आलेल्या आम्हा ५४ आमदारांना हा निधी दिला आहे, असे आ. किरण सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 27/Oct/2025














