प्रशांत यादव आज उमेदवारी अर्ज भरणार

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे विद्यमान आमदार शेखर निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे प्रशांत यादव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निकम विरूद्ध यादव असा सरळ सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रशांत यादव हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळी १०:३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल.

चिपळूणची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कारण या ठिकाणी अजित पवार विरूद्ध शरद पवार या दोन राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने यादव उद्या सकाळी १० वा. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत तर दि. २८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शेखर निकम आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही उमेदवारांकडून मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 24-10-2024