दापोली : दिवाळी सुट्टी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर दापोलीत पर्यटनाला अक्षरशः उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांत दापोली तालुक्यातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून, यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे समजते.
हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग, होमस्टे यांसह पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवसाय ‘हाउसफुल’ झाले आहेत. दर्जेदार तमासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णे बंदरात पर्यटकांची मासळी खरेदीसाठी झुंबड उडाली. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच अन्य राज्यातील शहरांमधून आलेले पर्यटक दापोलीतील हर्णे, मुरुड, लाडघर, कर्दे, पाळदे या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करत आहेत.
अरबी समुद्रात सध्या वादळी वातावरण असूनही पर्यटकांची उपस्थिती कमी झालेली नाही. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दापोली पोलिसांनी सतत गस्त ठेवली असून, किनाऱ्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा चाप बसवला आहे. दापोलीचे समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण पुन्हा एकदा सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ ठरले आहे.
दापोलीचे समुद्रकिनारे आणि ताज्या मासळीचे पदार्थ पर्यटकांसाठी पसंतीचे ठरत आहेत. मासळीच्या ताजेपणामुळे व स्थानिक पाककलेच्या खास स्वादामुळे पर्यटकांचा उत्साह वाढला आहे, तर पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायाला चालना मिळत आहे. पर्यटकांचा वाढलेला ओघ दापोलीच्या पर्यटन व्यवसायाला नवी उंची देत आहे-मकरंद म्हादलेकर, पर्यटन व्यावसायिक, आंजर्ले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 27/Oct/2025












