Chiplun : ‘मार्केट डे’ मधून विद्यार्थ्यांत उमटली लघुउद्योगाची जाणीव

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या डेरवण येथील इंग्लिश शाळेत ‘मार्केट डे’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या अथवा पालकांची मदत घेऊन बनविलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स लावून खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

मार्केटमध्ये विद्यार्थ्यांनी सजावटी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, दिवाळी विशेष उत्पादने, खाद्यपदार्थ, पेये, चटपटीत चाट आणि पारंपरिक पदार्थ अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. शोपीस, फ्रिज मॅग्नेट्स, पेपर बुके, शुभेच्छा कार्डे, कापडी पिशव्या, पर्स, पेन स्टँड, कंदील, रांगोळी, फराळाचे पदार्थ, चॉकलेट मिल्कशेक, भेळ, कॉर्न चाट, तसेच केळ्याचे पीठ, पापड, मेतकूट अशा अनेक हॅन्डमेड वस्तूंनी स्टॉल्स गजबजून गेले होते. आकर्षक ‘सेल्फी पॉईंट’ देखील तयार करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी सौजन्यपूर्ण संवाद साधत व्यवहार कौशल्य, गणितीय ज्ञान, जमा खर्च नोंद आणि संवादकौशल्य यांचा उत्कृष्ट वापर केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकता, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित करण्याची संधी मिळाली. ‘मार्केट डे’ उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी गंधारेखा बारपाटे, यश कापडी व ओंकार तांबे या शिक्षकांनी पार पाडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 27/Oct/2025