Ratnagiri Vitthal Mandir : विठ्ठल मंदिर परिसर विकासासाठी पालकमंत्र्यांकडून तीन कोटीचा निधी

रत्नागिरी : प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीच्या बाजारपेठ भागातील श्री विठ्ठल मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. त्याकरिता पालकमंत्री उदय सामंत यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सोमवारी (ता. २७) सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली.

या सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वीच तीन कोटी रुपये विशेष निधी म्हणून नगर पालिकेकडून मंजूर करून दिले आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे या कामाला सुरवात करता आली नव्हती. प्रति पंढरपूर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या या मंदिराला फार मोठी सामाजिक आणि धार्मिक अशी परंपरा असल्यामुळे सर्वांनाच हा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या मंदिराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटिश सरकारने सनद सुरू केली आहे.

ऐतिहासिक वारसा
ब्रह्मदेशचे राजे थिबा यांनी रत्नागिरीमध्ये वास्तव्याला असताना या मंदिराला भेट देऊन आपल्या राजघराण्यातील आरसा भेट दिला आहे. अजूनही तो मंदिराने व्यवस्थित जतन केला आहे. महसुली गाव रहाटागरची निर्मिती झाली, तिची सुरवात या मंदिराच्या चतुःसीमा निश्चित करून झाली असल्यामुळे या जागेला क्रमांक एकने नोंदण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिराचा अनेक नेतेमंडळींनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्यासपीठ म्हणून उपयोगही केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 27/Oct/2025