Ratnagiri : छत्रपती नगरात साकारला ३० फूट लांबीचा भव्य ‘विजयदुर्ग किल्ला’

रत्नागिरी : श्री शिवशंभू मित्र मंडळाने यंदाच्या दिवाळी उत्सवानिमित्त शहरातील छत्रपतीनगर, साळवी स्टॉप येथे मराठा आरमाराचा आधारस्तंभ असलेल्या श्री विजयदुर्ग किल्ल्याची भव्य आणि हुबेह्व प्रतिकृती साकारली आहे. तब्बल १५ दिवस रात्रंदिवस मेहनत घेऊन साकारलेला हा ३० फूट लांब, १५ फूट रुंद आणि ४ फूट उंच जलदुर्ग सध्या परिसरातील चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे.

मंडळातील शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, आर्यन चव्हाण, रुचिग मूडे, सुधीर मावडी, आदेश शेलार, तनिष रेडीज, अनिल बावडेकर, सिद्ध भोरे, श्रीयोग चव्हाण, अखिलेश बांबाडे, वैभव पांचाळ, अजय रेडीज, गौरव सावंत, निखिल सावंत, प्रसाद सावंत, अभिजित गिरकर, अथर्व वरे, नेहा सावंत, ऋषी दुधाने, अंशिका शिंदे, शिवांगी चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, राजस वने, अद्वैत रासकर, यश सुर्वे, श्रेयस झगडे, शुभम मावडी, ऋत्विज पेडणेकर, वेदांत सावंत व इतर सदस्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक ठेवा उभा केला आहे.

प्रतिकृतीतील खास आकर्षण विजयदुर्ग किल्ल्याचे महत्त्वपूर्ण बांधकाम जसे की, जीवीचा दरवाजा, गोमुखी दरवाजा, सदर दारू कोठार, हनुमान मंदिर, जखीणीची तोफ, जखिण मंदिर, माडी, खलबतखाना आणि बारा तोफ यांसारखे बारकावे हुबेहूब साकारले आहेत. किल्ल्यावर सदाशिव, गोविंद, मनोरंजन, गगन, शिवाजी, व्यंकट, शहा, शिंदे सिकंवरा, तुटका, दर्या, सर्जा, राम, माडी आणि घनची असे महत्त्वाचे बुरुज दर्शवले आहेत. या जलदुर्गाच्या चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला देखावा तयार करण्यात आला आहे.

या किल्ल्याच्या उद्घाटन प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्ठे, योगेश विरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा किल्ला त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुला राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 27/Oct/2025