राष्ट्रीय धोरण शिक्षण व्यवस्थेला आकार देणारे : प्रा. प्रभात कोकजे

माखजन : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता विद्यार्थ्यांचे वय, रुची या मुख्य गोष्टी विचारात घेऊन आराखडा बनवण्यात आला आहे. विद्यार्थी घडवत असताना त्याला आवडत्या क्षेत्रातील शिक्षण सहजतेने घेण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन सुजाण नागरिक बनवणे आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे शिक्षण व्यवस्थेला खऱ्या अर्थाने आकार देणारे ठरेल, असा विश्वास शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. प्रभात कोकजे यांनी व्यक्त केला.

प्रा. कोकजे म्हणाले, प्रत्येक शिक्षकाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करताना त्याचा आराखडा समजून घेण्याची गरज आहे. आज विद्यार्थ्यांना अनावश्यक विषय घ्यावे लागतात व त्यात रुची नसतानाही त्याच्या परीक्षा देत पुढे सरकावे लागते; पण नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊनच विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र कायम ठेवले असून तंत्रज्ञानाधारित व अनुभवाधारित शिक्षणाला महत्त्व दिले आहे. पारखद्वारे एकसामान मूल्यमापन व्यवस्थाही केल्याचे त्यांनी सांगितले.

डाएट प्राचार्या नीता कांबळे मार्गदर्शनाखाली व अधिव्याख्याते राजेंद्र लड्ढे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण सुरु आहे. यावेळी सुलभक म्हणून प्रा. भात कोकजे, प्रा. मानसी गानू, सुधीर शिंदे काम पाहत आहेत. उद्घाटनावेळी मुख्याध्यापक राजेंद्र वारे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 27/Oct/2025