विठ्ठल मंदिर सुशोभीकरणासाठी ३ कोटी; उदय सामंतांच्या हस्ते भूमिपूजन, शिवसृष्टी, सेमीकंडक्टर प्रकल्प ते अटलजींच्या स्मारकापर्यंत विकासावर चौफेर फटकेबाजी

रत्नागिरी (दि. २७ ऑक्टोबर): रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या मंदिराच्या परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि धार्मिक पर्यटनाला (Religious Tourism) चालना देण्यासाठी शासनाकडून ३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, हा रत्नागिरीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या मंगलमयी कार्यक्रमाप्रसंगी श्री भैरी देवस्थान अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, विठ्ठल मंदिर विश्वस्त आनंद मराठे, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, प्रमोदशेठ रेडीज, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, बंड्याशेठ साळवी, सुदेश मयेकर, विजय खेडेकर, स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, विजय पेडणेकर, मानसी करमरकर, राजू तोडकर, समीर तिवरेकर यांच्यासह शहरातील मान्यवर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महायुतीत समन्वय कसा असतो हे दाखवून दिले: उदय सामंत

भूमिपूजनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या खास शैलीत चौफेर फटकेबाजी करत सडेतोड भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची नावे घेत, “नगरपालिकेची निवडणूक कधीही लागू शकते, कुणी नाराज व्हायला नको,” अशी मिश्किल टिप्पणी केली.

ते पुढे म्हणाले, “मयेकर साहेब, महायुतीमध्ये समन्वय कसा असतो हे मी आज तुम्हाला दाखवून दिले आहे. एकही नारळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने वाढवला नाही, सगळे नारळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढवले. त्यामुळे आता भाजप-शिवसेनेमध्ये समन्वय नाही, हे सांगायला मी काही अर्थ ठेवलेला नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

यशाचे श्रेय रत्नागिरीच्या मतदारांना

मंदिराच्या निधीबद्दल बोलताना सामंत यांनी यशाचे संपूर्ण श्रेय रत्नागिरी आणि संगमेश्वरच्या मतदारांना दिले. “आज तुम्ही माझा जो सत्कार केला, तो मी रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने स्वीकारला. जर जनतेने मला सलग पाचव्यांदा निवडून दिले नसते, मी पालकमंत्री झालो नसतो, तर या मंदिराला ३ कोटी रुपये देऊ शकलो नसतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी अशोक मयेकर यांनी आर्ट गॅलरीच्या उद्घाटनावेळी केलेल्या सुशोभीकरणाच्या मागणीची आठवण करून दिली व पुढच्या एकादशीपर्यंत हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदार आणि नगरपालिकेने घ्यावी, असे निर्देश दिले.

यासोबतच, “महाराष्ट्रातील सर्वात उंच विठ्ठलाच्या मूर्तीवर छत्र उभारण्याची मागणी मामा (अशोक मयेकर) तुम्ही केली होती. मी शब्द देतो, येत्या दोन-चार दिवसांत त्याचे इस्टिमेट बनवून ते छत्र देखील आपण नक्की उभे करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.


रत्नागिरीच्या विकासाचा धडाका: पालकमंत्र्यांनी सांगितली ‘विकासगाथा’

उदय सामंत यांनी केवळ मंदिराच्या कामावर न थांबता, रत्नागिरी शहरात महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या अनेक मोठ्या प्रकल्पांचा पाढाच वाचला.

  • पर्यटन विकास: “ज्या रत्नागिरीची ओळख मंदिरांपासून आहे, त्या भैरीदेव मंदिर, विश्वेश्वर मंदिर आणि आता विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी देता आला हे माझे भाग्य आहे. शिवसृष्टी उभी राहिल्यापासून आतापर्यंत १ लाख २० हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. अरबी समुद्राच्या बाजूला असलेले देशातील हे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. तसेच, दीड वर्षापूर्वी देशातला सर्वात उंच संभाजी महाराजांचा पुतळा देखील रत्नागिरीत उभा राहिला आहे.”
  • रोजगार निर्मिती: “पर्यटन वाढले तरच व्यापारी वर्ग जगेल. यासोबतच, चंपक मैदानावर १५ हजार कोटींचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प होतोय. पुढच्या वर्षीपासून आपल्या मुलांना नोकरीसाठी मुंबईला जावे लागणार नाही, तर त्यांच्या आई-वडिलांसमोरच त्यांना नोकरीची संधी मिळेल.”
  • ऐतिहासिक प्रकल्प:
    • बौद्ध विहार: “थिबा राजाने जिथे गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली, त्या ठिकाणी देशातले पहिले शासनाने बांधलेले बौद्ध विहार रत्नागिरीत होत आहे. हायकोर्टानेही ते बौद्ध विहारच आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे.”
    • थेट स्टेडियम: “देशातील पहिले अंडरआर्म क्रिकेट स्टेडियम रत्नागिरीत होत असून, त्याला कान्होजी आंग्रे यांचेच नाव दिले जाईल.”
    • अटलजींचे स्मारक: “माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे केवळ स्मारकच नाही, तर त्यांनी देशासाठी काय केले हे दाखवणारे भव्य स्मारक रत्नागिरीत उभारण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे.”
    • भागोजी शेठ कीर स्मारक: “दानशूर भागोजी शेठ कीर यांचा देशातील पहिला सर्वात मोठा पुतळा आणि स्मारक रत्नागिरीत उभे राहिले असून, पावसानंतर त्याचे उद्घाटन होईल.”
    • नमो उद्यान: “दिव्यांग बांधवांसाठी नावीन्यपूर्ण ‘नमो उद्यान’ शहरात उभे राहत आहे.”

दोन महिन्यांत रत्नागिरी खड्डेमुक्त करणार

भाषणाचा समारोप करताना त्यांनी शहरातील रस्त्यांच्या बिकट अवस्थेची कबुली दिली. “रस्त्यांची अडचण ही एकच त्रुटी आहे जी मी मान्य करतो. पण १४ मे पासून सुरू असलेला पाऊस कालपर्यंत सुरू होता. आज मी विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो, की पुढच्या दोन महिन्यांत रत्नागिरी शहरात एकही खड्डा शिल्लक ठेवणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी रत्नागिरीकरांना दिला.