गुरुवारपासून कोकणातील वादळी पावसाचे सावट दूर होण्याची शक्यता

Maharashtra Weather 2024
Maharashtra Weather 2024

रत्नागिरी : गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाने ठिय्या मांडला आहे. दिवसा उघडीप तर रात्री जोरदार असा पावसाचा खेळ सुरू आहे. मंगळवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार वादळी पावसाने झोडपले. या पावसाने खरीप लागवडीतील शिवारे झोडपून काढली असून अनेक भागात भाताला फटका बसण्याची शक्यता आहे.

लांजा, दापोली मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यात मंगळवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गुरुवारपासून वादळी पावसाचे सावट दूर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण विभागात यंदा मोसमी पावसाची वाटचाल दमदार राहिली आहे. आतापर्यंत पावसाने चार हजार मि.मी. ची सरासरी पावसाळी हंगमाताच पूर्ण केली तर २६ ते २८ टक्के पाऊस या मोसमात अतिरिक्त ठरला आहे.

पावसाचा हंगाम उलटून वीस दिवस लोटले तरी कधी परतीच्या तर कधी वादळी पावसाने कोकणचा पिच्छा सोडलेला नाही. त्यामुळे खरीप लागवड क्षेत्रात कापण्या खोळंबल्या असून गेला आठडाभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात भात पीक आडवेही झाले आहे. काही भागात नुकसानही झाले असून त्याचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री पावसाने रत्नागिरीच्या अनके भागाला अक्षरशः झोडपून काढले, लांजा, रत्नागिरी, मंडणगड आणि चिपळूण तालुक्यात पावसाचा जोर होता. काही भागात हानीही झाली असल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, उद्यापासून वादळी पावसाचा पिच्छा सुटण्याची शक्यता आहे. मात्र, २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान काही भागात पावसाची शक्यता आहे तर नोव्हेंबर महिन्यात पावसाची पूर्णतः उघडीप घेणार असून हलक्या शीतलहरी कोकणचा ताबा घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारपर्यंत दक्षतेचे आवाहन

प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात वादळीवारे व विजांच्या गडगटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे. उंच झाडे, विजेचे खांब यासारख्या विजेचे सुवाहक असलेल्या वस्तूच्या खाली उभे राहू नका. अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे. विजेचे अर्थिंग कायम कार्यरत ठेवा. वीज कोसळण्याच्या धोक्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 24-10-2024