गुहागरमधून भास्कर जाधव आज अर्ज भरणार

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यालयातून सहा उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत. यामध्ये राजेश बेंडल, प्रमोद गांधी त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील २, चिपळूण तालुक्यातील १ व गुहागर शहरातून एक उमेदवारासाठी अर्ज नेण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना उबाठाचे नेते व विद्यमान आमदार भास्कर जाधव हे आज (दि.२४) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

गुहागर विधानसभा निवडणूक कार्यालयातून सहा उमेदवारी अर्जाचे वितरण झाले आहे. यामध्ये खेड तालुक्यातील असगणीचे संदीप हरी फडकले आणि शेल्डीचे प्रमोद परशुराम आंब्रे, चिपळूण तालुक्यातील कापसाळचे संदेश दयानंद मोहिते, गुहागर तालुक्यातील मुंढरचे प्रमोद सिताराम गांधी आणि गुहागर शहरातील पराग पांडुरंग कांबळे व राजेश रामचंद्र बेंडल यांची नावे सांगून अर्ज नेण्यात आले आहेत.

राजेश बेंडल हे गुहागरचे माजी नगराध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. मंगळवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पराग कांबळे हे बळीराजा सेनेचे पदाधिकारी आहेत. प्रमोद गांधी मनसेचे संपर्कप्रमुख असून गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. असगणीत राहणारे संदिप फडकले हे मनसैनिक असून कुणबी समाजाचे नेतृत्व करतात.

दरम्यान, आमदार भास्कर जाधव गुहागरमधून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. २४ ऑक्टोबरला शक्तिप्रदर्शन करून ते अर्ज दाखल करणार आहेत. गुहागर-चिपळूण मार्गावरून ते गुहागरला येतील. त्यावेळी विविध गावांतील समर्थक त्यांच्या ताफ्यात सामील होतील. गुहागरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीने आ. भास्कर जाधव गुहागरच्या निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती आ. जाधव यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 24-10-2024

https://prosperowealth.in