वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले शेकडो कार्यकर्ते ‘शिवतीर्था’वर, मनसेत घरवापसी

मुंबई (दि. २७ ऑक्टोबर):
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या राजकारणात (Konkan Politics) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (BJP) दाखल झालेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना मोठा धक्का बसला आहे. खेडेकर यांच्यासोबत भाजपात गेलेल्या त्यांच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडत, पुन्हा एकदा मनसेत ‘घरवापसी’ (Gharwapsi) केली आहे.

काही दिवसांपूर्वीच वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम दोन वेळा लांबणीवर पडल्यानंतर अखेर संपन्न झाला होता. खेडचे नगराध्यक्ष राहिलेल्या खेडेकर यांच्यासोबत कोकणातील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनीही भाजपची वाट धरली होती. मात्र, हा प्रवेश होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच, हे सर्व कार्यकर्ते भाजपामध्ये नाराज असल्याचे चित्र समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव खेडेकर यांची साथ सोडून या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, हा ‘घरवापसी’चा कार्यक्रम थेट मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ (Shivtirth) या मुंबईतील निवासस्थानी पार पडला आहे. भाजपमधून मनसेमध्ये परतणारे हे सर्व पदाधिकारी ‘शिवतीर्थ’ येथे उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा राजकीय उलटफेर वैभव खेडेकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या जिवावर खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच कार्यकर्त्यांनी आता त्यांची साथ सोडल्याने खेडमधील राजकीय समीकरणे (Khed Politics) पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, या ‘घरवापसी’मुळे कोकणातील मनसेला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 27-10-2025