Guhagar : पालपेणे कुंभारवाडी येथे विनापरवाना खैराची वाहतूक

गुहागर : तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथे अवैधरीत्या तोडलेल्या खैर लाकडाची चोरी उघडकीस आली आहे. वनविभागाने कारवाई करत १ लाख किमतीचा खैर सोलीव किटा ४.३२० घनमीटर विनापरवाना विनापास वाहतूक करत असलेले वाहन पकडले. लाकडासह व वनविभागाने जप्त करून संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी चिपळूण वनविभाग यांच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.

गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे खुलेआम खैरतोड होत असल्याची तक्रार कुंभारवाडीतर्फे पालपेणे येथील सोन्या शिवराम पालकर यांनी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार कुंभारवाडीतर्फे पालपेणे येथे जाऊन सोलीव किटा ४.३२० घनमीटर विनापरवाना विनापास वाहतूक करत असलेला टेम्पो (एमएच ०८, एपी ५२३६) लाकडासह जप्त केला. श्रीराम सॉ मिल खैर येथील शामजी अर्जुन पटेल (रा. चिखली, ता. गुहागर) यांना चौकशीसाठी ताब्यात दिले आहे. पंचनाम्याची कागदपत्रे तयार केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

गुहागर तालुक्यामध्ये खुलेआम चालणारी खैरतोड व जंगलतोडीने वन्यप्राणी रस्त्यावर येत आहेत. आरजीपीपीएल कंपनीने कोणतीही परवानगी न घेता खुलेआम जंगलतोड आपल्या आवारामध्ये सुरू ठेवली आहे. परिणामी, आज तेथील रानगवा व बिबटे अंजनवेलच्या मुख्य रस्त्यावर दाखल झाले आहेत. वनविभागाला २५ लाखांची गाडी दिली असून, फिरतीसाठी बोट देण्याचे आश्वासन देत कंपनीने आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये ही कारवाई झाली आहे.

मुद्देमाल वनविभागाच्या ताब्यात
ही कारवाई विभागीय वनाधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), सहायक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण), परिक्षेत्र वनाधिकारी, चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुहागर व वनरक्षक अडूर यांनी केली.

दरम्यान, तोड करण्यात आलेल्या खैराची किंमत एक लाख रुपये असून, वाहतूक करणारे वाहन पाच लाख रुपये किमतीचे आहे. सर्व मुद्देमाल वनविभागाने आपल्या ताब्यात ठेवला आहे. पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 27/Oct/2025