रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली असताना, प्रतिस्पर्धासमोर होणारी माझी लढत ही सरळ लढत होईल. त्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणार याची आपणाला पूर्ण खात्री असल्याचे किरण ऊर्फ भैया सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गुरुवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होताच किरण सामंत हे बुधवारी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रथमच विधानसभेला मी सामोरा जात आहे. यावेळी कुणाही प्रतिस्पर्धी उमेदवाराला कमी लेखण्याची गरज नाही. या निवडणुकीत आपण शंभर टक्के निवडून येणार याची पूर्ण खात्री आहे. त्यासाठी आमच्या पंखामध्ये बळ असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत लढत असताना महायुतीच्या माध्यमातून भविष्यात मतदारसंघात विकासकामे करण्यात येतील. भविष्यात ती कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर आहे. माझा राजापूर-लांजा- साखरपा या मतदारसंघात असलेला जनसंपर्क, माझ्यावरील मतदारांचे प्रेम, घटकपक्ष यांच्या सोबत राहून जास्तीत जास्त मताधिक्याने या निवडणूकीत निवडून येण्याचा आपला निर्धार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले. महायुती सरकारने या मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे मतदार जनता प्रचंड खुश आहे. आज राजापूर-लांजा-साखरपा असो वा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ असो येथील जनता महायुतीत समाविष्ट आहे. येथे महायुती निवडणूक लढत असताना कोणतीही अडचण येणार नाही. गेल्या अडीचवर्षात महायुतीने केलेला विकास भविष्यातही होणार आणि महायुतीमार्फत होणार आहे. यादृष्टीने या प्रवाहात राहण्यासाठी लोक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे किरण उर्फ भैया सामंत यांनी बोलताना सांगितले.
उदय सामंत करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे महायुतीकडून विधानसभेला रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवार असून ते शुक्रवारी २५ रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. छत्रपती शिवरायांना वंदन करून ते हॉटेल विवेकच्या मैदानावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांसह जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 24/Oct/2024














