रत्नागिरीची शिवसृष्टी ‘सुपरहिट’! १.२ लाख पर्यटकांची विक्रमी भेट, उदय सामंतांच्या कल्पनेला सलाम

रत्नागिरी (दि. २८ ऑक्टोबर) : रत्नागिरी शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर (Ratnadurg Fort) साकारण्यात आलेली ‘शिवसृष्टी’ (Shivsrushti) आता पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत (Uday Samant) यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या भव्य प्रकल्पाने रत्नागिरीच्या पर्यटनाला (Ratnagiri Tourism) नवी उंची प्राप्त करून दिली आहे.

या शिवसृष्टीच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच येतो की, लोकार्पण झाल्यापासून आजपर्यंत तब्बल एक लाख वीस हजार (1,20,000) पर्यटकांनी या शिवसृष्टीला भेट दिली आहे. या विक्रमी प्रतिसादामुळे रत्नागिरीच्या वैभवात मोठी भर पडली असून, शहराच्या पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराचा कायापालट करण्याच्या दृष्टीने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. शिवसृष्टीमुळे रत्नागिरी शहर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या वाढलेल्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या असून, येथील स्थानिक उद्योगधंद्यांनाही (Local Business) मोठी चालना मिळाली आहे.

अजित पवारांकडूनही गौरवोद्गार

या प्रकल्पाचे महत्त्व राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनीही अधोरेखित केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी काही काळापूर्वी या शिवसृष्टीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले होते आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनाही ही शिवसृष्टी आवर्जून पाहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी देखील या स्थळाला भेट देऊन पाहणी केली.

‘अरबी समुद्राजवळील महाराजांचे पहिले स्मारक’

या शिवसृष्टीचे सर्वात मोठे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे, हे ‘अरबी समुद्राच्या बाजूला असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक’ (First monument of Shivaji Maharaj near Arabian Sea) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याला आणि जाज्वल्य इतिहासाला अभिवादन करणारा हा एक भव्य आणि प्रेरणादायी प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.

रात्रीच्या वेळी विलोभनीय दृश्य

पर्यटकांसाठी ही शिवसष्टी दररोज सकाळी १०:०० वाजल्यापासून ते रात्री १०:०० वाजेपर्यंत खुली असते. विशेषतः रात्रीच्या वेळी, आकर्षक रोषणाई आणि दिव्यांच्या प्रकाशात ही संपूर्ण शिवसृष्टी अतिशय विलोभनीय आणि मोहक दिसते, जे पर्यटकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरत आहे.