रत्नागिरी (दि. २८ ऑक्टोबर):
रत्नागिरी शहरातील क्रिकेटपटूंसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रत्नागिरी पालिकेच्या हद्दीतील पेठकिल्ला (मत्स्ययोग ओपन स्पेस) येथे देशातील पहिल्या अंडरआर्म क्रिकेट स्टेडियमच्या (India’s First Under-arm Cricket Stadium) कामाचे भूमिपूजन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
सुमारे ३ कोटी रुपये खर्चून हे स्टेडियम उभारण्यात येणार असून, रत्नागिरीतील क्रिकेटपटूंसाठी हे एक मोठे आणि पुढचे पाऊल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. या भूमिपूजन प्रसंगी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख विपिन बंदरकर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक क्षणी मोठ्या घोषणा
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची संख्या प्रचंड आहे. मी स्वतः अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, हे केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील पहिले अंडरआर्म क्रिकेटचे मैदान आणि स्टेडियम रत्नागिरीत होत आहे. हा रत्नागिरीच्या विकासाचा एक ऐतिहासिक क्षण आहे.”
या स्टेडियमच्या नावाबाबत माहिती देताना ते म्हणाले, “हे स्टेडियम मिरकरवाडा (पेठकिल्ला) येथे असले तरी ते रत्नागिरी शहराच्या नावाने ओळखले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराला संरक्षण देणारे सरखेल कान्होजी आंग्रे (Kanhoji Angre) यांचे नाव या स्टेडियमला देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.” या संपूर्ण संकल्पनेची मांडणी युवा सेनेचे सहकारी केतन शेट्ये यांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले.
कब्रस्तानासाठी ५० लाखांचा निधी जागेवरच मंजूर
पालकमंत्री सामंत यांनी केवळ स्टेडियमचीच घोषणा केली नाही, तर उपस्थित मुस्लिम बांधवांच्या मागणीवर तात्काळ निर्णय घेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “माझ्या मच्छीमार बांधवांसाठी देखील अनेक विकासकामे करण्यात येतील. मिरकरवाडा येथील मच्छी सुकवणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारी जागा १०० टक्के मिळणार आहे. तसेच, मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी (Qabrastan) जागेचा प्रश्न आणि निधीची मागणी मान्य करत, मी याच बैठकीत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करत आहे.”
‘फेक नरेटिव्ह’ला बळी पडू नका – उदय सामंत
विकासकामांच्या जोरावर सामंत यांनी राजकीय विरोधकांवरही निशाणा साधला. “रत्नागिरीत राहणारे आणि देशावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांची कामे करणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, राजकीय विरोधकांकडून जातीय आणि धार्मिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी गेल्या २५ वर्षांत कधीही मुस्लिम बांधवांना दुखावले जाईल असे वक्तव्य केलेले नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “जाती-पातीपेक्षा शहर आणि जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे. मच्छीमारी क्षेत्रातील अडचणी असोत किंवा आठवडा बाजारातील महिलांचे प्रश्न, तुमच्यासोबत उदय सामंतच उभा होता, याची नोंद घेण्याची वेळ आली आहे. लोकसभा आणि विधानसभेला काहींनी ‘फेक नरेटिव्ह’ पसरवला. काही लोक चुकीच्या प्रचाराला बळी पडले. ‘आम्हाला तुम्हालाच मतदान करायचे होते, पण करता आले नाही’, असे सांगण्याची वेळ यावेळी स्वतःवर येऊ देऊ नका,” असे स्पष्ट आवाहनही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी उपस्थितांना केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 28-10-2025












