रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत असून, राणे, शिंदे यांच्याशी जवळचे संबंध असतानाही मी गद्दारी केली नाही.
शिवसेनेकडून मी तीन टर्म आमदार असून, जनतेचा हृदयापासूनच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. यावेळीही मी ६० हजाराचे मताधिक्क्य घेऊन विजयी होणार असल्याचा विश्वास राजापूर लांजा-साखरपाचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभेत महाविकास आघाडीचे १८८ उमेदवार विजयी होतील, यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि मी मंत्री होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित यशवंतराव आल्यामुळे पक्षाला आणखी बळकटी मिळणार आहे. त्यांच्या पाठीशी युवा वर्गाची मोठी ताकद असल्याचेही आ. साळवी यांनी सांगितले.
रिफायनरीला उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर नाणार रिफायनरी रद्द करण्यात आली. बारसू येथील जागेबाबत मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले होते. केंद्राने त्याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे आपण पाठिंबा दिला होता. परंतु स्थानिकांनी त्याला विरोध केल्यामुळे आपणही त्यांच्या पाठिशी आहोत, असे साळवी यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेत आम्ही ज्यांना मोठे केले, तेच पैशासाठी पक्ष सोडून गेले आहेत. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते ठाकरेंच्या सोबत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात दिसणारे प्रवेश हे वरवरचे असून, आमची खालची फळी मजबूत असल्याचेही आमदार साळवी यांनी सांगितले. माजी आमदार बाळ माने पक्षात आले असल्याने पक्षप्रमुख जो आदेश देतील, त्याप्रमाणे येथील पदाधिकारी व कार्यकर्ते काम करणार असल्याचेही साळवी यांनी स्पष्ट केले.
आज उमेदवारी अर्ज भरणार
महाविकास आघाडीचे राजापूरचे आमदार राजन साळवी हे गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. १० ते ११.४५ वाजत गाजत अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी राजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये महाविकास आघाडीचा मोठा मेळावा होणार आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 24/Oct/2024









