Chiplun UBT : महिला वैद्यकीय अधिकारी आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

चिपळूण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कथित सहभाग आणि राजकीय दबावामुळे आरोपींना मिळणाऱ्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण महिला आघाडीने राज्य सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची तातडीची मागणी केली आहे.

मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर लिहिलेल्या मजकुरानुसार पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकर आणि इतरांनी सतत छळ केला असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, तक्रार करूनही तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल महाडीक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दुर्लक्ष केल्याचे दस्तऐवज उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर, त्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे आणि रोहित नागतिळे हे आरोपींना संरक्षण देत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांन निवेदन देण्यात आले. हे निवेदन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र संघटिका रुमा देवळेकर आणि तालुका संघटिका मानसी भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी महादेव (बाळा) कदम, बळीराम गुजर, सचिन शेट्ये, संतोष पवार, अजित गुजर, मनोज पांचाळ, सचिन चोरगे, वैशाली शिंदे, दीप्ती सावंतदेसाई, तीर्था लाड, माधवी दिवटे आदी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 28/Oct/2025