◼️ “पक्षात घेतले आहे तर तेच आता त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतील”
◼️ बाळ मानेंच्या प्रवेशाने शिवसेना उबाठा पक्षात नाराजीचे वातावरण
रत्नागिरी : शिवसेना उबाठामध्ये पक्षप्रवेश करणारे माजी आमदार बाळ माने यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रवेश केला असता तर बरे झाले असते. उदय बनेंमध्ये असे काय कमी होते की पक्षाने त्यांना नाकारले. ही गोष्टपण पक्षाने कार्यकर्त्यांना सांगितली पाहिजे. का डावलले याचे आता उत्तर हवे, त्याचप्रमाणे त्यांना पक्षात घेतले आहे तर तेच आता त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतील, असे स्पष्ट मत उबाठामधून उमेदवारीसाठी इच्छूक असलेले ज्येष्ठ पदाधिकारी उदय बने यांनी व्यक्त केले. एकनिष्ठता ही राजकारणातील अंधश्रद्धा आहे, असे ठाम मत झाल्याचे त्यांनी सांगितले.
उबाठामध्ये भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी प्रवेश केल्यानंतर उबाठाच्या कार्यकारिणीमध्ये रत्नागिरी विधानसभेतील नाराजीचे वातावरण पसरले आहे. उबाठाच्या विभागप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठकही बुधवारी पार पडली. यावेळी निष्ठावंत राहिलो, ही चूक केली काय अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून उमटत आहेत.
याबाबत ज्येष्ठ पदाधिकारी व इच्छुक उमेदवार बने यांच्याशी संवाद साधला असता, आम्ही २०१३ मध्ये निष्ठावंत म्हणून आदेश पाळला. त्याची फळे मागील अडीच वर्षांपासून भोगत आहोत. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन देऊन उदय बने मतदार संघात का हवेत याबाबत उमेदवारीची मागणी केली होती. आता उमेदवार देताना बाळ मानेंबाबत कल्पनाही देण्यात आली नाही. स्वतः बाळ माने यांना उबाठामधून उभे रहायचे असल्याने, त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. परंतु तेही घेतले गेले नाही, अशा भावना उदय बने यांनी व्यक्त केल्या.
मातोश्रीवर त्यांना घेण्याची क्रिया घडली असून, यापुढे कार्यकर्त्यांमधून प्रतिक्रिया उमटतील, असेही त्यांनी सांगितले. पक्षाने त्यांना घेतले असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी तेच जबाबदारी घेतील, अशा भावनाही उदय बने यांनी व्यक्त केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 24-10-2024














