संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर टप्प्यातील चौपदरीकरणाला होणारा विलंब प्रवाशांच्या मुळावर येत आहे. हा त्रास लवकरात लवकर संपवा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा संगमेश्वरवासीयांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग आता नागरिकांसाठी भयाचा मार्ग ठरू लागला आहे. पावसाळा संपला तरीही या रस्त्याच्या दुर्दशेचे चक्र कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष दिसून येते. परिणामी, प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अठरा वर्षांपासून सुरू असलेले महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वाला गेलेले नाही. उलट नव्याने बनवलेल्या रस्त्यावरच ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत तर काही भागात मोठे खड्डे तयार झालेले आहेत.
दरवर्षी खड्डे भरून आणि मलमपट्टी करून कोट्यवधी रुपयांची बिले फाडली जातात; पण प्रत्यक्षात रस्ता जसाच्या तसा खड्डेमय आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर टप्प्यातील कामाला झालेल्या विलंबाने अनके ठिकाणी जुन्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या सहनशक्ती संपत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर नागरिकांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे-अनिल जाधव, संगमेश्वर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 29/Oct/2025










