मुंबई : एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगार प्रमुखांना फोन करून सांगावी. जेणेकरून त्याचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे. चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरले नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात. मात्र, या तक्रार नेमकी कुठे कराव्यात, हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. यापूर्वी एसटी बसेस मध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला असायचा. परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे झाले. त्यामुळे एसटीच्या प्रवासामध्ये काही समस्या अथवा अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागावी? हा एक मोठा प्रश्न प्रवाशांच्या समोर होता. त्यामुळे त्यांच्याच सूचनेवरून एसटी महामंडळाने आता प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 16-09-2024