Bamboo Farming : राजापूर तालुक्यात १९ हेक्टरवर बांबू लागवड

राजापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी राजापूर तालुक्यात प्रभावीपणे सुरू आहे. यंदा फळबाग लागवडीसोबत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय पंचायत समिती कृषी विभागाने केला आहे. तालुक्यासाठी ५०५ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान पाच हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आतापर्यंत ४४ हेक्टरचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी १९.०८ हेक्टरवर बांबू लागवड झाली आहे. त्यावर ८ लाख ६० हजार ८०८ रुपये खर्च झाला आहे.

गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींसाठी उदिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, प्रथमेश पाटील, प्रदीप सावंत ग्रामपंचायतींसह शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पंचायत समिती कृषी विभागातर्फे केले आहे.

बेरोजगारांच्या हाताला काम देताना त्याला किमान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत बांबू लागवडीचा समावेश केला आहे. बांबू लागवडीद्वारे शेतीच्या जोडीने शेतकऱ्यांना उपजीविकेचे नवीन साधनही उपलब्ध होत असून, त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासही मदत होणार आहे, असे आपटे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 29/Oct/2025