खेडमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरल्यास दंडात्मक कारवाई

खेड : खेड शहरात व्यावसायिकांसह काही व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर केला जात असल्याची बाब समोर आली आहे. प्लास्टिक पिशव्या बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना नगरप्रशासनाने दणका देण्याची तयारी ठेवली आहे. लवकरच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी असतानाही शासनाने आदेश धुडकावून लावत प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. यापूर्वी नगरप्रशासनाने प्लास्टिक बंदी विरोधातील मोहीम गतिमान करत व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईद्वारे दणका दिला होता.

कारवाईची मोहीम थंडावल्याने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्या बंदीसाठी मोहीम अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या पथकामार्फत शहरात मोहीम राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा साठा असणाऱ्या ठिकाणे देखील उद्ध्वस्त केली जाणार आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहनही नगरप्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 24/Oct/2024