Guhagar Beach : गुहागर किनाऱ्यावरील ३०० मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित

गुहागर : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘ब्ल्यू फ्लॅग’ (Blue Flag) मानांकनासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची तत्त्वतः निवड झाल्यानंतर आता या मानांकनाच्या तयारीला वेग आला आहे. राष्ट्रीय पर्यावरण विभागातर्फे पहिल्या टप्प्यात गुहागर आणि लाडघर या महत्त्वाच्या कोकण किनारपट्ट्यांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाले असून, या तपासणीमध्ये गुहागर समुद्रावरील ३०० मीटर आणि लाडघर समुद्रावरील ६४५ मीटर क्षेत्र पर्यटकांसाठी पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारचा खासकरून कोकण विभागासाठी हा पहिलाच महत्त्वाकांक्षी प्रयोग असून, निवड करण्यात आलेले गुहागर, लाडघर, श्रीवर्धन, नागाव व पर्णका (डहाणू) हे पाचही समुद्रकिनारे कोणत्याही परिस्थितीत ब्ल्यू फ्लॅग मानांकित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पर्यावरण विभागाचे बिश्वजित देव यांनी गुहागर आणि लाडघर या दोन किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट केले.
सुरक्षित क्षेत्र आणि विकासाचे नियोजन ७ किलोमीटर लांब असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यासाठी ब्ल्यू फ्लॅग मानांकनाकरिता ६०० मीटर क्षेत्र विकसित केले जाणार आहे. तपासणीदरम्यान, गुहागर येथील पोलीस परेड मैदाना मागील बाजूच्या समुद्रातील ३०० मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे आढळले. तर, लाडघर किनाऱ्यावरील ६४५ मीटर क्षेत्र सुरक्षित असल्याचे समोर आले असले तरी, अंतिम निर्णय अद्याप देण्यात आलेला नाही.

पायाभूत सुविधांची पाहणी सुरक्षा ऑडिटमध्ये किनाऱ्याशी संबंधित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांची सखोल पाहणी करण्यात आली. गुहागर शहरात येणारे रानवी गुहागर, मोडकाघर गुहागर, गुहागर कोर्ट कीर्तनवाडी व शिवाजीचौक मार्ग यांची पाहणी करून कनेक्टिव्हिटी निश्चित करण्यात आली. किनाऱ्यावर जाणारे एकूण ६ मार्ग निश्चित केले जाणार आहेत.

याशिवाय, प्रमुख मंदिरे आणि पोलीस परेड मैदानाची पाहणी झाली. किनाऱ्यालगत असलेली गुहागर नगर पंचायतची जागा तसेच सध्याची जागेची पातळी तपासण्यात आली. पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहाची जागा आणि विविध खाद्याचे स्टॉल उभारणीसाठी दोन ते तीन जागांची पाहणी केली गेली.

सुरक्षितता आणि पर्यावरणीय उपाययोजना समुद्रावरील अर्धवट तुटलेली जेटी काढून टाकणे किंवा तिथेच चांगल्या पद्धतीची फ्लोटींग जेटी किंवा सुशोभिकरण असे विविध पर्याय निवडले जाणार आहेत. भरती-ओहोटीची माहिती देणारे डिजिटल बोर्ड, तसेच कासव संवर्धन या सर्वच विषयांची पाहणी करण्यात आली.

या मानकांनुसार, गुहागर किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी ३ जीवरक्षकांची नेमणूक केली जाणार असून ३ वॉच टॉवर उभारले जातील. त्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा किटही पुरवले जाणार आहे. हे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाल्याने, आता लवकरच या किनाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन ब्लू फ्लॅग मानांकनाचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:51 PM 29/Oct/2025