दापोली : राज्य परिवहन विभागाकडून ‘शिवाई’ या ई-बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल करून प्रदूषणमुक्त आणि आधुनिक परिवहनाची दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या चमकदार उपक्रमांच्या आड ‘लालपरी’ मात्र अडचणीत सापडल्याचे चित्र दापोलीत स्पष्टपणे दिसत आहे.
दापोली आगारातील अनेक एस.टी. बसांच्या काचा तुटल्या असून, त्या जागी प्लास्टिक कागद किंवा कपड्यांचे तुकडे बांधून तग धरली गेली आहेत. प्रवाशांच्या सेवेत असलेली लालपरी आता अक्षरशः दयनीय अवस्थेत उभी आहे.
पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोलीत अशा विद्रूप एस.टी. बसचे दर्शन पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना दररोज घडत आहे. पावसाळ्यात गळक्या बस, तुटलेल्या आसनांमुळे होणारा त्रास, आणि बसची झालेली मोडतोड हे दृश्य प्रवाशांना अस्वस्थ करते.
दापोली आगाराला यापूर्वी काही नवीन बस देण्यात आल्या आहेत, त्या बसमध्ये देखील आवश्यक सुविधा किंवा साहित्य उपलब्ध नसल्याची तक्रार प्रवाशांकडून कायम व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी देवदर्शन, सवलतीच्या योजना अशा अनेक सोयी महामंडळ देते, मात्र आधीच मोडकळीस आलेल्या लालपरींची अवस्था प्रवाशांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. लालपरी नव्या ढंगात, रुपडे पालटून परत प्रवाशांच्या सेवेत यावी अशी मानसिकता स्थानिक अधिकाऱ्यांची असली तरी वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पर्यटननगरीत अशा जीर्ण अवस्थेतील बस उभ्या असणे म्हणजे एस.टी. महामंडळाच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचविणारे ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 30/Oct/2025














