Ratnagiri Anti-Corruption Department : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जनजागृती

रत्नागिरी : भ्रष्टाचार निर्मूलनासाठी रत्नागिरी व चिपळूण शहरात ठिकठिकाणी लाचलुचपत विभागाची माहिती देणारे फलक लावण्यात आले असून, जनजागृती केली जात आहे. भ्रष्टाचाराच्या समस्येवर मात करून पारदर्शक व नीतिमान महाराष्ट्र घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता सप्ताह साजरा केला जात आहे. या विभागातर्फे २ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लाचलुचपत विभागाकडून ‘राष्ट्र समृद्धी’ ही संकल्पना घेऊन विभागाच्या सर्व कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत शपथ घेण्यात येत आहे.

रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर सर्कल, जिल्हा परिषद, जेलनाका, जिल्हाधिकारी कार्यालय, शहर बसस्थानक, माळनाका येथील पादचारी उड्डाणपूल, शासकीय विश्रामगृह, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी दर्शनीभागावर लाचलुचपत प्रतिबंधकाचे टेलिफोन नंबर, टोल फ्री नंबर, वेबसाईट, ई-मेल आयडी आदी माहिती दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत.

शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी तसेच बसस्थानक येथे तेथील नागरिकांना एकत्र करून त्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत माहितीपत्रके वाटण्यात आली. चिपळूण येथे शासकीय कार्यालये, बसस्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी जाऊन जनतेला भ्रष्टाचार निर्मूलनाची माहितीपत्रके वाटण्यात आली. तसेच जनजागृतीही केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 30/Oct/2025