Uday Samant-Raj Thackeray: “ज्या काँग्रेसनं महाराजांचा अपमान केला…”; ‘नमो सेंटर’ टीकेवरून उदय सामंत रत्नागिरीतून राज ठाकरेंवर बरसले!

रत्नागिरी: “मनसे अध्यक्षांना कोणीतरी चुकीचे ब्रीफिंग (माहिती) दिले आहे. ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत जाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,” अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘नमो सेंटर’ उभारण्यावरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, सामंत यांनी एकनाथ शिंदे यांनीच शहरांची नावे बदलून ‘खरा वारसा’ जपल्याचा दावा केला. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शिंदे साहेबांनीच खरा वारसा जपला”

राज ठाकरे यांनी किल्ल्यांवर ‘नमो सेंटर’ उभारण्याच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत आक्रमक पवित्रा घेत म्हणाले, “मनसे अध्यक्षांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे.”

सामंत यांनी काँग्रेसच्या इतिहासाचा दाखला दिला. ते म्हणाले, “(नेहरूंचे पुस्तक, कर्नाटक प्रकरणाचा उल्लेख करत) ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत जाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. एकनाथ शिंदे साहेबांनीच औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ करून खऱ्या अर्थाने महाराजांचा वारसा जपला आहे.”

किल्ल्यांवरील उपक्रम पर्यटकांसाठी

किल्ल्यांवरील उपक्रमाची भूमिका स्पष्ट करताना सामंत म्हणाले, “युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. तेथील पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे आणि त्यांना त्या परिसराची व किल्ल्यांची माहिती मिळावी यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत.”

राणेंशी फोनवर चर्चा, कोकणात ‘महायुती’वर एकमत

याच पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी कोकणातील महायुतीच्या समीकरणांवरही मोठे विधान केले. ते म्हणाले, “खासदार नारायण राणे यांनी जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असे म्हटले आहे, आणि ते सर्वांनाच लागू आहे.”

याचबरोबर, सामंत यांनी एक महत्त्वाची माहिती उघड केली. “आत्ताच १५ मिनिटांपूर्वी माझे आणि राणे साहेबांचे फोनवर बोलणे झाले. आम्ही दोघेही महायुतीसाठी आग्रही आहोत आणि महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्यावर आमचे एकमत आहे,” असे सांगत त्यांनी कोकणातील राजकीय चर्चेला नवी दिशा दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 31-10-2025