Bamboo Farming : राजापूरसाठी ५०५ हेक्टर क्षेत्रात बांबू लागवडीचे उद्दिष्ट

राजापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची गेल्या काही वर्षामध्ये तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यावर्षी फळबाग लागवडीसोबत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्धार पंचायत समितीच्या कृषी विभागाने केला आहे. तालुक्यासाठी ५०५ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे ४४ हेक्टरच्या प्राप्त प्रस्तावांपैकी १९.०८ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झाली आहे. त्यातून ८ लाख ६० हजार ८०८ रूपयांची उलाढालही झाली आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाच हेक्टर याप्रमाणे तालुक्यातील १०१ ग्रामपंचायती मिळून तब्बल ५०५ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून त्याअनुषंगाने पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, प्रथमेश पाटील, प्रदीप सावंत ग्रामपंचायतींसह शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पं. स. कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

बेरोजगारांच्या हाताला काम देताना त्याला किमान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना गेल्या काही वर्षापासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कुशल आणि अकुशल अशा साऱ्यांना रोजगार मिळतो. त्याचवेळी वैयक्तिक फळबाग लागवडीतून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येते.

ही योजना तालुक्यामध्ये गेल्या दशकभरापासून प्रभावीपणे राबवण्यात येत असून त्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या कृषी विभागाने यावर्षी फळलागवडीसोबत कमी श्रमामध्ये लोकांना जादा उत्पन्न मिळवून देणारी बांबू लागवड करण्याचा निर्धार केला आहे. बांबू लागवडीद्वारे शेतीच्या जोडीने शेतकऱ्यांना उपजीविकेचे नवीन साधनही उपलब्ध होत असून त्याचा लाभ घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 01/Nov/2025