लांजा : स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून शहरातील कोत्रेवाडी येथे जबरदस्तीने डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायत प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले झाले आहेत. आगामी विधानसभेसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, तसे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना देण्यात आले.
गेली वर्षभर लांजा शहरात डम्पिंग प्रकल्पावरून नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनामध्ये घमासान सुरू आहे. प्रशासनाकडे वारंवार अर्ज, विनंती आणि आंदोलने करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर नागरिकांनी आगामी विधानसभेसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, भोंगळ कारभार व बोगस प्रस्ताव करून लोक वस्तीजवळ डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प कोत्रेवाडीच्या माथी बळजबरी मारत आहेत. येथील लोकवस्ती उद्ध्वस्त करण्याचा घाट न. पं. प्रशासनाकडून घातला गेला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या विरोधात नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, लांजा तहसील कार्यालय, नगरपंचायत प्रशासन यांच्याकडे अनेकवेळा तक्रार केली आहे. अनेकवेळा या विरोधात आंदोलने, उपोषणे छेडली आहेत. मात्र, नागरिकांच्या न्याय हक्काकडे नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोत्रेवाडी ग्रामस्थ न्याय हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी लोकशाही मागनि लढत असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोत्रेवाडी नागरिकांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना देण्यात आले आहे.
कोत्रेवाडीतील जागा योग्य नसल्याचा अहवाल
लांजा नगरपंचायतीकडे घनकचरा प्रकल्पासाठी इतर अन्य जागांचे प्रस्ताव उपलब्ध असताना देखील नगरपंचायत कोत्रेवाडी या एकाच जागेवर अडून बसली आहे. या प्रस्तावित जागेकडे जाण्यासाठी शासनाचा अधिकृत रस्ता नसून जवळच जलस्त्रोत आहेत, लोकवस्ती जवळ आहे. या जागेची पाहणी जिल्हा समितीने करून शासनाच्या निकषात योग्य नसल्याचा अहवाल यापूर्वीच दिलेला आहे. असे असताना देखील नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथीलच जागेचा अट्टाहास का ? याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 24/Oct/2024














