दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे-राजवाडी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी घडली असून दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद (अ.मू.र.नं. ७४/२०२५) करण्यात आली होती.
प्राथमिक चौकशीदरम्यान मयताचे नातू कौशिक संजय दुबळे (वय २५, रा. राजवाडी, ता. दापोली) यांनी पोलिसात दिलेल्या खबरीवरून ही नोंद करण्यात आली होती. मात्र, चौकशीदरम्यान या घटनेत मोठा द्विस्ट समोर आला आहे. मयताच्या घरात शोध घेताना पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली असून ती मयताच्या स्वहस्ताक्षरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चिठ्ठीत मयताने जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक व्यवहारामुळे आपले जीवन संपवित असल्याचे नमूद केले असून त्यात दोन व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहिलेली आहेत. या दोघांची नावे अनुक्रमे संदेश शंकर कदम (वय ४८, सध्या रा. जालगाव बर्वेवाडी, मुळ रा. हर्णे राजवाडी, ता. दापोली) आणि अमोल भालचंद्र गुरव (वय ३९, रा. मोठीगोडीबाव मराठी, ता. दापोली) अशी आहेत.
मयताने आपल्या चिठ्ठीत नमूद केले आहे की, जमिनीच्या व्यवहारातील ४० लाख रुपये वरील दोघांनी परत न दिल्यामुळे त्याला मानसिक ताण आला आणि त्यामुळेच तो आत्महत्येस प्रवृत्त झाला. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास करून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २.४१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पूजा हिरेमठ करीत आहेत. या घटनेमुळे राजवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 01/Nov/2025














