Seagull Bird : पावसामुळे दापोली समुद्रकिनाऱ्यांवर ‘सीगल’चे आगमन लांबणीवर !

दापोली : दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पांढऱ्या शुभ्र ‘सीगल’ पक्ष्यांचे थवे उतरतात. आकाशभर झेपावणारे हे परदेशी पाहुणे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरतात. हिवाळ्यात किनाऱ्यांवर या पक्ष्यांची झेप पाहणे म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच असते.

यंदा हिवाळ्यापर्यंत पावसाळाच लांबल्याने या ‘सीगल’ पाहुण्यांचे आगमन उशिरा होणार असल्याचे दिसते. समुद्रकिनाऱ्यांवरील ओलसर हवामान आणि वारंवार पडणारा पाऊस यामुळे स्थलांतरित पक्ष्यांना अनुकूल वातावरण तयार झालेले नाही, अशी माहिती निसर्गप्रेमींनी दिली.

गेल्या काही वर्षांत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंजर्ले, पाळंदे आणि हर्णे किनाऱ्यांवर या पांढऱ्या पक्ष्यांचे थवे दाखल होतात. मात्र, यंदा अजूनही त्यांचा मागमूस नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दापोलीच्या किनाऱ्यांवर दाखल होणारे हे पक्षी त्यांच्या मोहक झेपांनी समुद्रकिनाऱ्याचा नजारा अधिक देखणा करतात.

स्थानिक छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी या ‘पांढऱ्या पाहुण्यांच्या’ आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत हवामान स्थिर झाल्यानंतर हे सुंदर परदेशी पाहुण्यांचे पुन्हा थवेच्या थव्याने दापोलीच्या किनाऱ्यांवर उतरणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 03/Nov/2025