Mahavitaran : विद्युत सहायक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर

रत्नागिरी : महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी नियमानुसार ५० टक्के मयदित १ हजार ८४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी www. mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये ६ व ७ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.

महावितरणने ५ हजार ३८१ विद्युत सहायक पदासाठी २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. त्यानंतर उमेदवारांची निवड यादी व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट व ९ व १० सप्टेंबरदरम्यान पाच दिवसांत करण्यात आली. निवड यादीतील उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय अपात्रता, गैरहजर व इतर कारणांचा विचार करून कंपनी नियमानुसार जाहिरात केलेल्या पदाच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत ३१ ऑक्टोबरला प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.

तथापि दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत ‘परिस्थिती जैसे थे’ ठेवण्याचा आदेश १० सप्टेंबरला दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी दिल आहे. त्यानुसार या प्रतीक्षा यादीमध्ये दिव्यांग प्रवर्ग वगळण्यात आल आहे. विद्युत सहायक पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये येत्या ६ व ७ नोव्हेंबरला होणार आहे. या दोन्ही दिवशी संबंधित परिमंडलांमध्ये सकाळी १० वाजत मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे, असे महावितरणतर्फे
कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 03/Nov/2025