साखरपा : रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे (ता. संगमेश्वर) येथील एसटी निवारा शेडच्या छताचे पत्रे पडून दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. गेली अनेक वर्षे ह्या शेडची दुरवस्था झाली आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे हे स्थानक महत्वाचे मानले जाते. नजीकच्या लांजा, शिपोशी, कनकाडी, मेघी ह्या गावांमधील ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने एसटीसाठी येतात. असे असले तरी इथे असलेली निवारा शेड ही गेली अनेक वर्षे एसटी प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे. ठिकठिकाणी छप्पर मोडलेल्या अवस्थेतील ही शेड प्रवाशांना धोकादायक झाली आहे. अशातच शनिवारी झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेडवरील दोन पत्रे अचानक आतमध्ये पडून शेडमध्ये एसटीची वाट पहात असलेल्या दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. गावातील अन्य ग्रामस्थांनी त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे नेऊन औषधोपचार केले.
एसटीला मिळणारे भाडे जाते कुठे ?
एसटी बस स्थानकात असलेले कॅन्टीन हे येथील नितिन हेगिष्टे जवळपास तीस वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. त्याचा मोबदला म्हणून हेगिष्टे नियमितपणे देवरुख डेपोला भाडे देतात. या भाड्यातून ह्या निवारा शेडची डागडुजी अपेक्षित असते. पण गेली अनेक वर्षे एसटी प्रशासनाने शेडकडे दुर्लक्ष केले आहे. ठिकठिकाणी झालेली पडझड, उडालेले पत्रे, शेडमध्ये आणि वर उगवलेले गवत, बसण्यासाठी कोणतीही सोय नाही अशा अवस्थेतील ही निवारा शेड एसटीच्या अनास्थेचे प्रतीक आहे, कॅन्टीन चालक नितीन हेगिष्टे यांनी याआधी स्वखर्चाने शेडवर पत्रे टाकले होते आणि बसण्यासाठी कडप्पेही बसवले होते. पण भाडे स्वरुपात घेत असलेल्या पैशांचे एसटी प्रशासन करते काय, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 03/Nov/2025














