दापोली : दापोली तालुक्यातील शिवाजीनगर आणि साखलोळी नं. १ या दोन गावांना जोडणाऱ्या, गावतळे-टाळसुरे रस्त्यावरील नदी पुलावरून प्रवास करणे सध्या धोक्याचे ठरत आहे. पुलाच्या आर. सी. सी. सळ्या बाहेर पडल्याने आणि मोठा खड्डा तयार झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र या धोकादायक स्थितीकडे बांधकाम विभागाने डोळेझाक केल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
२०१६ मध्ये हा नवीन पूल बांधण्यात आला होता, पण केवळ ८ वर्षांच्या आतच पूल जीर्णावस्थेत पोहोचला आहे. २०२४ मध्येच सळ्या बाहेर पडल्या होत्या. शिवाजीनगर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला पत्र पाठवून पुलाच्या दुरुस्तीची मागणी वेळोवेळी केली होती. त्यावर एकदा विभागाने फक्त वरवर मुलामा देऊन काम भागवले. मात्र मूळ समस्या अद्याप कायम आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यानंतर पुन्हा त्या सळ्या बाहेर आल्या असून पुलावर मोठा खड्डा पडला आहे. गावतळे परिसरातील तब्बल ३२ गावांसाठी हा रस्ता दापोलीशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे नागरिक, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थी यांचे जीव धोक्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 03/Nov/2025














