चिपळूण-संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. चिपळूणमध्ये झालेल्या उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेनंतर चिपळूणमध्ये हा संघर्ष अधिकच निर्माण झाला आहे. आता सोशल मीडियावर देखील हा संघर्ष दिसून येत असून, निकम आणि यादवांचे कार्यकर्ते आपापल्या समर्थकांचे व्हिडीओ, रिल्स आणि संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करीत आहेत.

चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात १९९० पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. ९० नंतर हा मतदारसंघ शिवसेनेने काबीज केला. त्यानंतरच्या काळात माजी आ. रमेश कदम यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणला. पुन्हा दहा वर्षे शिवसेनेने येथे सत्ता मिळविली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम हे घड्याळ चिन्हावर विजयी झाले. त्यामुळे शेखर निकम यांच्यासाठी ही तिसरी निवडणूक ठरणार आहे. पहिल्या निवडणुकीत त्यांनी पराभव पचवून दुसऱ्या निवडणुकीत मोठा विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्यासाठी ही तिसरी लढाई आहे. मात्र, पहिल्या टर्ममध्ये आ. शेखर निकम यांनी तब्बल अडीच हजार कोटींची कामे मतदारसंघात आणली. जनतेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत यादव हे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ते तयारीला लागले आहेत. वाशिष्ठी दूध प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी चिपळूणमध्ये पशु- पक्षी व शेतकरी संमेलनाचे आयोजन केले. यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये आपला संपर्क वाढविला. विविध मंडळे, संस्था यांना मदत सुरू केली व मतदारसंघात सक्रिय राहिले. काँग्रेसमध्ये तालुकाध्यक्ष असताना त्यांनी हे काम वाढविले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून त्यांना आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर होणार आहे. त्या दृष्टीने ते तयारीला लागले आहेत. त्यासाठी त्यांच्या पत्नी स्वप्ना यादव यांनी कंबर कसली आहे. प्रशांत यादव यांच्यासाठी त्याही मतदारसंघात उतरल्या आहेत. त्यामुळे चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा कडवा संघर्ष पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यात यादव यांनीदेखील वातावरण निर्मिती करण्यात यश मिळविले आहे.

सोशल मीडियावर रंगले ‘वॉर’
सद्यस्थितीत मतदारसंघातील विविध व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक व अन्य सोशल मीडियावर निकम व यादव यांच्यामध्ये सोशल वॉर पाहायला मिळत आहे. एकामागून एक त्यांचे समर्थक वेगवेगळ्या पोस्ट टाकत आहेत. आ. निकम यांच्याकडून त्यांनी केलेल्या विकासकामांच्या रिल्स, विविध पोस्ट, पोस्टर्स व्हायरल केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला यादव यांच्याकडून वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून उभे केलेले काम व मतदारसंघातील गाठीभेटी या बाबतच्या पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 24/Oct/2024