Chiplun Nagar Parishad : चिपळूण बाजारपेठेत व्यावसायिकांकडून १३ किलो प्लास्टिक जप्त

चिपळूण : प्लास्टिक वापरावर शासनाने घातलेली बंदी धाब्यावर बसवून बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर चिपळूण नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत १५ व्यावसायिकांकडून १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. नगर परिषद वेळोवेळी कारवाई करीत असली तरी पूर्णपणे बंदी अजून लागू झालेली नाही. त्यामुळे प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर थेट कारवाई करण्याची मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने कारवाईच्या सूचना नगर परिषदेला येत असल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे व मंगेश पेढांवकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, दीपक किंजळकर, रोहन सकपाळ, राजेंद्र नवरथ, मनीष जाधव आणि ५ स्वच्छतादूतांच्या पथकाने मिळून ही कारवाई केली. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांनी धसका घेतला असून प्लास्टिक वापर टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 04/Nov/2025