रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसीतील आरजू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस विभागाने कंपनीच्या गोदामांमध्ये असलेला कच्चा माल, तयार झालेला पक्का माल आणि मशीनरी यासह अनेक वस्तू जप्त केल्या होत्या. पोलिस विभागाच्या विनंतीवरून, शासनाने जप्त मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
जीवन देसाई यांनी सोमवारी पोलिसांसमवेत जप्त मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल तयार करून, महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्यानुसार, पडून असलेल्या कच्च्या मालाच्या लिलाव प्रक्रियेची परवानगी न्यायालयाकडून मागण्यात येणार आहे. रोजगार आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीचे दिवाळे निघाले आहे. कंपनीविरोधात तक्रारी दाखल झाल्यावर पोलिसांनी एमआयडीसीतील त्यांचे सुसज्ज कार्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि ५ गोदामे सील केली. या कारवाईमुळे मशीनरीसह सुमारे ४ कोटींचा कच्चा आणि पक्का माल पडून आहे. कंपनीने मालमत्ता भाड्याने घेतल्याने, पोलिस तपासात कंपनीची वैयक्तिक मालमत्ता नसल्याचे उघड झाले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ५८७ गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या. यावरून कंपनीची व्याप्ती मोठी असून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. कंपनीने ज्या जागा भाड्याने घेतल्या आहेत, त्यापैकी फक्त एका जागेसाठी एमआयडीसीची परवानगी घेतली आहे, त्यामुळे तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी ऑफिस, ट्रेनिंग सेंटर आणि गोदाम सील केले. कंपनी कच्चा माल देऊन बनवलेला पक्का माल स्वतः घेऊन मार्केटमध्ये विकत होती. परंतु, अनेक ग्राहकांनी बनवण्यासाठी दिलेल्या मालांपैकी ६० टक्क्यांहून अधिक माल खराब केला. त्याचा बोजा गुंतवणूकदारांवरच पडला आहे. कंपनीने काही गुंतवणूकदारांना परतावाही दिला आहे. २ लाख रुपये दिले असल्यास कंपनीने १ लाख ९० हजार रुपये परत दिले आहेत, परंतु उर्वरित १० हजारांसाठीही तक्रारी झाल्याचे तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत फसवणुकीचा आकडा ७ कोटीच्या वर गेला आहे. मात्र, कंपनीकडे अजूनही ४० ते ५० लाखांच्या मशीनरीसह कच्चा पक्का असा ४ कोटींचा माल पडून आहे.
सक्षम प्राधिकृत अधिकारी जीवन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजू प्रायव्हेट लिमिटेडच्या कच्चा मालाचा ताबा घेऊन न्यायालयाच्या आदेशानंतर लिलाव प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी पोलिसांसमवेत एकूण पाच गोदामांपैकी ३ गोदामांची तपासणी केली, तर उर्वरित दोन गोदामांची तपासणी मंगळवारी करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण ५८७ ठेवीदारांची सुमारे ७ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे उघड झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 04/Nov/2025












