दापोली : उठा उठा.. मतदानाची वेळ झाली.. घोषणा देत हर्णेमध्ये जनजागृती

दापोली : उठा उठा निवडणूक आली, मतदानाची वेळ झाली, अशा घोषणा देत हर्णे बंदरापासून स्विप कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. ही जबाबदारी प्राथमिक शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी हर्णे बंदरामध्ये उत्तमप्रकारे पार पाडली. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज होत असून, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जाणीव जागृतीसाठी दापोली विधानसभेसाठी शिक्षण विभागामार्फत तयार केलेल्या स्विप कलापथकाच्या विविध कार्यक्रमांचा प्रारंभ झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक निर्णय अधिकारी तथा अण्णासाहेब बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली स्विप सहायक नोडल अधिकारी बळीराम राठोड आणि तालुक्यातील निवडक शिक्षकांच्या स्विप कला पथकाने हर्णे बंदर, कोळीवाडा येथून पथनाट्य, गीतगायन, प्रात्यक्षिक करून मनोरंजनातून मतदान जाणीव जागृतीस प्रारंभ केला.

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, अशा घोषणा देण्यात आल्या. संजय मेहता, बाबू घाडीगावकर, महेश गिम्हवणेकर, सुनील साळुंखे, विलास साळुंखे, राहुल राठोड, अस्मिता बालगुडे, सुनंदा मळगे, संजीवनी लाडे, स्मिता कदम, आदी सर्व प्रबोधन करणार आहेत. वैजयंत देवचरकर, महेश शिंदे, नितीन गुहागरकर यांची संगीतसाथ लाभणार आहे.

हे पथक संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहे. यासाठी महाविद्यालयीन स्तर ते अंगणवाडी सेविकेपर्यंत सर्वत्र मतदान जाणीव जागृतीने मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न असून, निवडणूक निर्णय अधिकारी अगदी तळागाळापासून प्रयत्न करीत आहेत. – अण्णासाहेव बळवंतराव, स्वीप नोडल अधिकारी, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 24/Oct/2024