राजापूर : राजापूर शहरात एकीकडे मोकाट गुरे आणि मालकांची बेफिकिरी, तर दुसरीकडे मासे विक्रेत्यांचे रस्त्यावरच बस्तान कायम असून अद्याप कार्यवाही नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरांचा प्रश्न मालकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे वाढला असून यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. तसेच रस्त्यावर बसून मच्छी विक्रीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मोकाट गुरे आणि त्यांचे बेफिकीर मालक यामुळे नगर परिषदेचे प्रशासन त्रस्त झाले असून मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर होत असताना महामार्गावरच नव्हे तर राजापूरमध्ये ठिकठिकाणी अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी राजापूर नगर परिषदेने शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली खरी मात्र अशी दहा गुरे पकडून त्यांची रवानगी कोंडवाड्यात करण्यात आलेली असताना त्यापैकी सहा गुरांना सोडवण्यासाठी महिनाभरात गुरांचे मालकच फिरकले नसल्याने हा गुंता सोडवायचा, कशी चिंता प्रशासनाला भेडसावत आहे. कोंडवाड्यातील या गुरांचा चारापाण्याची तजविज न.प.ला करावी लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजापूर शहरवासीयांना सतत मोकाट गुरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या वर्दळीत भररस्त्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांमुळे अपघातही होत आहेत. यामध्ये मोकाट गुरेही दगावली आहेत. यामुळे मोकाट गुरांची समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
महिनाभरापूर्वी त्याबाबत प्रशासनाला निवेदन देत काही लोकांनी आंदोलनही छेडले होते. त्यानंतर प्रशासनाने मोकाट गुरांविरोधात आक्रमक पवित्रा घेत कारवाईचा बडगा उगारला. त्यात नगर परिषदेने शहरामध्ये फिरणाऱ्या दहा मोकाट गुरांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दंडात्मक रक्कम भरून चार गुरे मालकांनी सोडवून ताब्यात घेतली. त्यानंतर अद्यापही नगर पालिकेच्या कोंडवाड्यामध्ये सहा गुरे आहेत. ती सोडविण्यासाठी गुरांचे मालक महिना झाला तरीही फिरकलेले नाहीत. त्यामुळे सध्या कोंडवाड्यातील त्या गुरांच्या लिलावाची पालिकेने नोटीस प्रसिद्ध केली. त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. गेले महिनाभर ही गुरे पालिकेच्या कोंडवाड्यातच आहेत. अजूनपर्यंत नगरे परिषदेने एकूणे २२ मोकाट गुरांना पकडून मालकांकडून नऊ हजार ९०० रुपयांचा दंड स्वःनिधीत जमा केला आहे. यामुळे नगर परिषद प्रशासन त्रस्त झाला आहे.
रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करताना मासे व भांडी जप्त करण्यात येतात. पाच महिन्यांत रस्त्यावर अनधिकृत पद्धतीने मासे विक्री करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. योग्य ती कारवाई करण्यात येत नसल्याने पुन्हा पुन्हा त्या मच्छी विक्रेता महिला रस्त्यावर बसून मच्छी विक्री करीत आहेत. यामुळे शिवाजी पदपथ दुर्गंधीचे आगार झाले आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसून रस्त्यावर मच्छी विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐराणीवर आला आहे. याबाबत न.प. प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 05/Nov/2025














