Guhagar : गुहागरात भातशेतीच्या नुकसानाचे पंचनामे सुरू

गुहागर : तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिवाळीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास शासनाकडून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करून ग्रामपंचायतीत द्यावीत, असे आवाहन नीलेश सुर्वे यांनी केले आहे.

गुहागर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे भाताला कोंब फुटले तसेच पाण्यात भिजल्याने जनावरांसाठीचा पेंढाही भिजून खराब झाला आहे. नुकसानीची भरपाई करून शेतकऱ्यांचे दुःख थोडे हलके करावे यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे कृषी विभागातर्फे सुरू आहेत. हे पंचनामे करत असताना आवश्यक असलेला शेतीचा सातबारा व आठ-अ चा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, शेतकऱ्याचा फार्मर आयडी आणि झालेल्या नुकसानाचा फोटो आदी कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये द्यावीत. जेणेकरून पंचनाम्याची कार्यवाही वेगाने होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा पदाधिकारी नीलेश सुर्वे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 05/Nov/2025