Ganpatipule : गणपतीपुळे समुद्रात बुडताना पर्यटकाला वाचण्यात यश

गणपतीपुळे : दिवाळी पर्यटन हंगामात गणपतीपुळे समुद्रात लागोपाठ समुद्रात बुडणाऱ्यांची संख्या ताजी असतानाच नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील २५ वर्षीय पर्यटक तरुणाला समुद्रात बुडताना वाचविण्यात यश आल्याची माहिती समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांकडून देण्यात आली आहे. शशांक धीरेंद्र कुलकर्णी (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील सहा तरुण मित्र देवदर्शन आणि पर्यटनासाठी आले होते. त्यातील सर्वजण समुद्रस्नानासाठी उतरले होते. यातील शशांक कुलकर्णी हा समुद्राच्या खोल पाण्यात गेल्यानंतर अडकला. यावेळी त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता, समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांचे कर्मचारी यांनी आपल्या जेटस्की बोटीच्या मदतीने बुडणाऱ्या तरुणाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर खोल पाण्यात बुडत असलेल्या शशांकला त्यांनी सुखरूपरीत्या पाण्याबाहेर काढले.

ही कामगिरी मोरया वॉटर स्पोर्टचे कर्मचारी कैलास किशोर शितप आणि आरिफुल यांनी केली. त्यांना गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक यांची मदत प्राप्त झाली. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या मालगुंड गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बुडणाऱ्या तरुणाची माहिती घेतली. त्यानंतर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांना समुद्राच्या धोकादायक स्थितीची माहिती कोणीही खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. दिवाळी पर्यटन हंगामात समुद्रात बुडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली असताना जयगड पोलिस ठाण्याकडून किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच गणपतीपुळे ग्रा. पं. चे जीवरक्षक, देवस्थान सुरक्षा रक्षक आणि स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्याकडून वारंवार पर्यटकांना सूचना दिल्या जात आहेत मात्र, तरीही पर्यटकांकडून अतिउत्साहीपणा दाखवला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 AM 06/Nov/2025