विश्वविजेता महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली

विश्वविजेता महिला क्रिकेट संघाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पीएमओ निवासस्थानी पंतप्रधानांनी क्रिकेट विश्वात तिरंगा झेंडा उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचं स्वागत केलं. विश्वचषक 2025 मध्ये महिला टीम इंडियाने दक्षिण आफ्रेकिवर 52 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात तब्बल 52 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला संघाने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच टीम इंडियाच्या विजयाबद्दल ट्विटरवरुन अभिनंदन आणि कौतुक केलं होतं. मैदानावर भारतीय संघाच्या पोरींनी दाखवलेल्या धाडसी आणि शानदार खेळीचं पुन्हा एकदा कौतुक केलं.

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर हरमन प्रीत कौरने 2017 मधील भेटीची आठवण जागवली. 2017 मध्ये भारतीय महिला संघ पंतप्रधानांना भेटला होता. पण, तेव्हा हाती ट्रॉफी नव्हती, असे हरमनप्रीतने म्हटले.

स्मृती मंधानानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच प्रोत्सहन आणि प्रेरणा देतात, असे म्हटले. मोदींचे शब्द प्रत्येक खेळाडूला एक नवी ऊर्जा देतात असेही तिने म्हटले.

दरम्यान, या भेटीत मोदींनी टीम इंडियातील सर्वच खेळाडूंशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी, संघाकडून मोदींनी नमो लिहिलेली आणि सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली खास जर्सीही गिफ्ट देण्यात आली.

मंगळवारी भारतीय महिला संघ मुंबईतून दिल्लीत पोहोचल्यानंतर दिल्लीतही टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं.

दरम्यान, वर्ल्डकप चषकासह टीम इंडिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 06-11-2025