गुहागर : तळवली बौद्धवाडीत कृषीयंत्रे आणि अपघातांबाबत जागृती

गुहागर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व कृषी अभयांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली यांच्या वतीने दि. १७ ऑक्टोबर रोजी गुहागर तालुक्यातील तळवली बौद्धवाडी येथे राष्ट्रस्तरीय कृषियंत्रे व इतर शक्ती साधनांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कृषी आणि संबंधित क्षेत्रातील संबंधित श्रमविज्ञान आणि सुरक्षितता योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रगतशील शेती करण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक कृषी साधने कोणती, त्यांचा वापर कसा करावा, ती कशी हाताळावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भातशेती लावणी यंत्र, नारळ काढणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या यंत्रांचा वापर करून आपण आपला वेळ, श्रम, पैसा वाचवून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेऊ शकतो याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयांतील प्रमुख अन्वेषक डॉ. व्ही. व्ही. आवारे, सहाय्यक प्रा. डॉ. म. ल. जाधव, कर्मचारी प्रसाद होळकर, स्वरूप भाटकर उपस्थित होते. जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी होऊन तळवली बौद्धवाडी येथील ५० शेतकऱ्यांनी शेती यंत्रांची माहिती करून घेतली. तसेच तळवली येथे शेती यंत्रांसह येऊन येथील शेतकरी ग्रामस्थांना माहिती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 24/Oct/2024