दापोली : भरपूर पाऊस असतानाही शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात दापोली नगरपंचायत अपयशी ठरली आहे. नागरिकांना चार दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असतानाच नगरपंचायतीने पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखल्यांचे दर आणि विविध कर वाढविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या जनविरोधी प्रस्तावाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा तर्फे बुधवारी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून ८ नोव्हेंबरला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सांगितले की, भरपावसातही नागरिकांना पाणी मिळाले नाही. पाणीपुरवठा नियोजन, साठवण आणि व्यवस्थापन कोलमडले आहे. तरीही सत्ताधारी करवाढ लादून नागरिकांना आर्थिक झळ देत आहेत. हा निर्णय जनविरोधी असून तत्काळ मागे घ्यावा. पूर्वी ३० रुपयांना मिळणारा जन्म किंवा मृत्यू दाखला आता थेट १०० रुपयांचा करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
नवजात बाळापासून मृत्यूपर्यंत नगरपंचायत कर वसूल करत आहे, आता दापोलीत जन्म आणि मृत्यूही महाग झाला आहे, अशी टीका गुजर यांनी केली. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापनातील ढिलाई, तसेच पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार न मिळणे याबद्दलही त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला. ठराव मागे घेतला नाही तर घराघरात जनजागृती मोहीम राबवून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, शहर प्रमुख संदीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, सचिव नरेंद्र करमरकर, महिला उप जिल्हा संघटिका मानसी विचारे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 07/Nov/2025













