रत्नागिरी : अनेक भागात भात कापणीच्या हंगामातच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर लोंबीतील दाण्यालाच रुजवा आला असून, दाणा झोडून घेतला तरी पूर्ण स्वच्छ, भरलेला भात मिळणार नाही. या परिस्थितीने शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी खचून न जाता ओलिताचा फायदा घेत कमी कालावधीची कडधान्य पिके घ्यावीत, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चितच नुकसानभरपाई मिळेल, परंतु याची वाट न पाहता शेतकऱ्यांनी पडलेल्या ओलीताचा फायदा घेऊन कमी कालावधीची कडधान्य पिके घेणे गरजेचे आहे. यामुळे केवळ काही प्रमाणात उत्पन्न मिळणार नाही तर जमिनीचा कस सुधारणार आहे. ओलीत पीक म्हणून योग्य पर्याय असून भातानंतर ओलीत जमिनीवर पावटा, कुळीथ, मूग आणि चवळी ही पिके घेता येतात. ही सर्व पिके कमी पाण्यातही चांगली वाढतात, जमिनीतील नायट्रोजन वाढवतात आणि पुढील खरीपासाठी जमीन सुपीक बनवतात. भात कापणी झाल्यावर शक्य तितक्या लवकर ओलीतवर थेट पेरणी अथवा टोकणी करणे शक्य आहे.
मूग ७५ ते ८० दिवसांत येते, ओल्या जमिनीत उत्तम उगवते. कुळीथ अतिशय सहनशील, कमी खर्चिक व जमिनीचा कस राखणारे पीक आहे. चवळी – कमी ओलावा, कमी वेळ व उच्च पोषणमूल्य. पावटा शेंगवर्गीय, स्थानिक बाजारात मागणी असलेले पीक. बियाण्यांवर रायझोबियम व फॉस्फेट सॉल्व्हलाईझिंग बॅक्टेरिया उपचार केल्यास पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कमी कालावधीच्या कडधान्यांची लागवड सुरू करावी, असे आवाहन गांधी यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 07/Nov/2025














